यवतमाळ (वृत्तसंस्था) धारदार शस्त्राच्या धाकावर सराफा व्यापाऱ्याचे साडेतीन लाखांचे दागिने लांबवल्याची खळबळजनक घटना वसंतनगर ते चिचपाड दरम्यानच्या टेकडी माथ्यावर २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. सागर मेघराज वर्मा (वय ४० रा. शंकर टॉकीजजवळ, दिग्रस) असे व्यापाऱ्याचे नाव आहे.
सागर वर्मा यांचे काळी दौलत येथे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. वर्मा यांचे चुलत भाऊ आनंद गोपाल वर्मा यांच्यासोबत दुकान बंद करून आपल्या कारने घरी जात होते. दरम्यान वसंतनगर ते चिचपाड रोडवर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चार अनोळखींनी पाठलाग करत त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करीत नीचे उतरो, अशी धमकी दिली. खाली उतरताच लुटारूंनी कोयत्याने वार केला. यात सागर वर्मा यांच्या डोळ्याखाली जखम झाली. तसेच वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतरआनंद वर्मा यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून दोन सोन्याच्या अंगठ्या, वाहनाच्या डिक्कीतील थैलीत ठेवलेले सोने व चांदीचे दागिने, टॅब, चार्जर असा एकूण ३ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पसार झाले. याबाबत दिग्रस पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















