अमरावती (प्रतिनिधी) मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले चिखलदरा तालुक्यातील टोकावरील काजलडोह गावातील तिघांचा मध्य प्रदेशातील कवड्या येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये काजलडोह येथील पिता-पुत्रासह पुतण्याचा समावेश आहे.
मध्य प्रदेशातील कवड्या गावात बांधलेला तलाव वजा बंधारा काजलडोहपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. रविवारी शंकर सुकाली मरसकोल्हे (३२), सागर शंकर मरसकोल्हे (१३) या पिता पुत्रासह शंकर यांचा पुतण्या आयुष बिरू मरसकोल्हे (१३, तिघेही रा. काजलडोह) हे तिघे मासेमारी आणि खेकडे पकडण्यासाठी गेले होते.
दुपारी दीड वाजता अचानक सागर बुडत असताना शंकर व पुतण्या आयुषने त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठी धाव घेतली आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. एका पाठोपाठ तिघेही बुडाल्याचे पाहून त्यांना ईतर व्यक्तींनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता. या घटनेने काजलडोह गावात शोककळा पसरली आहे. कारण एकाचवेळी कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यातही दोन मुलांचा त्यामध्ये समावेश होता. या घटनेने संपूर्ण गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.