नांदेड (वृत्तसंस्था) मुखेड तालुक्यातील मौजे सकनूर येथे खेकडे पकडण्यास गेलेल्या चार जणांना विजेचा धक्का बसला. त्यात दोघे जण मरण पावले तर दोघे जण गंभीर जखमी झाले. संभाजी पुंडलिक नागरवाड (२१), शिवाजी रामदास सुरूमवाड ( २०) अशी मृत मित्रांची नावे आहेत. तर त्यांच्या बचावासाठी गेलेले दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकनुर येथील संभाजी पुंडलिक नागरवाड, शिवाजी रामदास सुरूमवाड, संजय मारुती नागरवाड, विजय संभाजी हंबीरे हे मित्र खेकडे व मासे पकडण्यासाठी ३१ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास गावालगतच्या नाल्यात खेकडे व मासे पकडण्यासाठी गेले होते. नाल्याला लागून असलेल्या शेतात एका शेतकऱ्याने वन्य प्राण्याचा त्रास होऊ नये म्हणून ऊसाला तारेचे कुंपण लावून त्यात वीज प्रवाह सोडला होता.
पावसात भिजतच हे चारही मित्र खेकडे पकडत नाल्याद्वारे रात्री साधारण नऊ ते दहा च्या दरम्यान त्या शेताच्या बांधावर पोहोचले. परंतु रात्रीच्या अंधारात त्या तारा कुणालाही दिसल्याच नाहीत. त्यामुळे बांधावर पोहोचताच बांधावरील वीज प्रवाह चालू असलेल्या तारामध्ये संभाजी पुंडलिक नागरवाड (२१ वर्षे), शिवाजी रामदास सुरूमवाड ( वय २०) या दोघांचा पाय अडकला.
काही कळण्याच्या आताच दोघं जागीच मरण पावले. तर त्यांच्या मागे काही अंतरावर चालणाऱ्या संजय मारुती नागरवाड व विजय संभाजी हंबीरे यांना शिवाजीचा हात लागला. त्यामुळे विजय व संजय बाजूला फेकले गेले. तर तारेस चिटकून बसल्याने संभाजी व शिवाजी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पैकी विजय हंबीरे याने मोबाईल वरून घटनेची माहिती नातलगांना दिली. त्यामुळे गावातील नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच मुक्रमाबाद पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुक्रमाबादच्या रुग्णालयात नेले. जखमींना मुखेडच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.