चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात बँकेच्या कामानिमित्त आलेल्या पिलखोड येथील ८० वर्षीय वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बसस्थानकात घडली होती. याप्रकरणी गुरुवारी बस चालकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (वय ८०) ह्या बुधवारी दुपारी बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सायंकाळी येथील बस स्थानकावर आल्या. सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास औरंगाबाद-धुळे या धुळे आगाराच्या बसने (एमएच १४ बीटी २३५२) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी वृद्धेचा नातू शांताराम पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात बसचालक सुनील लक्ष्मण बिडगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार अजय मालचे करत आहेत.

















