
जळगाव (प्रतिनिधी) – इतने टाईम से मेला लगारे हमारे को पैसे नही देरे असे म्हणत आनंद मेळाव्यात शिरुन अरबाज शकील शेख यांच्यावर चॉपर सारख्या शस्त्राने वार केले. तसेच त्यांच्या खिशातील पंधराशे रुपये जबरीने काढून घेतले आणि मेळावा पाहण्यासाठी आलेल्यास देखील मारहाण केल्याची घटना दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास खान्देश मिल परिसरातील आनंद मेळाव्यात घडली. पोलिसांनी पळून जाणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील खान्देश मिल परिसरात अरबाज शकील शेख (वय २६, रा. उस्मानिया पार्क) यांनी दि. ८ ऑक्टोंबर रोजी पासून आनंद मेळावा भरविला असून त्याठिकाणी झोके लावले आहे. दि. १२ रोजी सायंकाळी रात्रीच्या सुमारास गेटवर त्यांच्याकडे काम करणारे हे लोकांकडून टिकीट तपासून त्यांना आत सोडत होते. दरम्यान, अरबाज शेख हे आनंद मेळाव्यात चक्कर मारीत असतांना तेव्हा त्यांना दोन ते तीन इसम त्यांना इतने टाईमसे मेला लगारे हमारे को पैसे नही देरे किसे पुछके मेला लगारे असे म्हणत शिवीगाळ करु लागले. त्यावेळी तिघांनी अरबाज शेख यांना मारहाण करीत त्यांच्या कानाच्या मागे चॉपर सारख्या शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.
मेळावा पाहण्यासाठी आलेल्या देखील मारहाण
आनंद मेळावा लावणाऱ्यास मारहाण करीत असतांना त्या तिघांनी मेळावा पाहण्याकरीता आलेल्या मो. अनस खान खलील खान रा. शाहूनगर यांना देखील मारहाण केली. दरम्यान, अरबाज शेख यांच्या खिशातून पंधराशे रुपये काढून घेतले.
तिघांविरुद्ध गुन्हा एकाला अटक
भांडण सुरु असतांना पोलिसांचे वाहन आल्यामुळे गर्दीचा फायदा घेत दोघे पळून गेले, तर पोलिसांनी सागर हिरामण कोळी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सागर कोळी याला अटक करण्यात आली आहे.
















