
जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणने वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ शुक्रवारपासून सुरू केली. जळगाव परिमंडलात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी मूळ थकबाकी भरून अभय योजनेत व्याज व दंडमाफीचा लाभ घेतला.
या योजनेत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. यासह मागणीनुसार पुनर्जोडणी तात्काळ मिळणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक ‘अभय योजना २०२६-२७’ साठी पात्र आहेत.
मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. ही योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा फायदा देण्यात येईल. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना ३ वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के तर ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरूपी खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. लघुदाब घरगुती व व्यावसायिक वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० टक्के व १५ टक्के सूट मिळेल. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी ६ समान व्याजमुक्त मासिक हप्ते तर उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार व्याजमुक्त ३ ते ६ हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे.
यासोबतच मंजूर भार २० किलोवॅटपर्यंत आहे अशा ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाईल. विशेष म्हणजे या योजनेत सहभागी सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत जळगाव परिमंडलातील १२ ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरून व्याज व दंडमाफीचा लाभ घेतला. जळगाव मंडलातील १० व धुळे मंडलातील २ ग्राहकांचा यात समावेश आहे. या ग्राहकांना मागणीनुसार तात्काळ पुनर्जोडणी देण्यात येणार आहे.
‘अभय योजना २०२६-२७’ साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहक अर्ज करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
















