
अमळनेर (प्रतिनिधी) – काही शस्त्रक्रिया या केवळ वैद्यकीय उपचार नसतात, तर त्या डॉक्टरांच्या ज्ञानाची, अनुभवाची, संयमाची, कौशल्याची आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेची खरी कसोटी असतात. अशाच एका अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रियेत सुखांजनी हॉस्पिटलचे प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ.जयेश शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाहूनगर अमळनेर येथील सौ.चित्रा मुकेश भोई वय 37 वर्ष यांना अतिविशाल गर्भाशयातील फायब्रॉइड (Huge Fibroid Uterus) या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्येचा सामना करावा लागत होता. त्यांच्या गर्भाशयामध्ये तब्बल १८ × १५ सेंटीमीटर आकाराची आणि २५०० ग्रॅम वजनाची प्रचंड मोठी फायब्रॉइडची गाठ होती. एवढ्या मोठ्या आकाराची गाठ गर्भाशयापासून सुरक्षितपणे अलग करून शस्त्रक्रिया पार पाडणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे काम होते. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेचे नियोजन, अचूक वैद्यकीय निर्णय, विशेष कौशल्य, अनुभव आणि संपूर्ण वैद्यकीय टीममधील समन्वय यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करीत सुखांजनी हॉस्पिटल, अमळनेर येथील डॉ. जयेश शिंदे यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या आणि अनुभवाच्या बळावर ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
वैद्यकीय कौशल्यासोबतच माणुसकीच्या सेवाभावाची जोड..!
आजच्या आधुनिक वैद्यकीय युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचारपद्धतींना निश्चितच महत्त्व आहे; परंतु त्यासोबत डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाप्रती असलेली संवेदनशीलता, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि संपूर्ण टीमची समर्पित मेहनत हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. सुखांजनी हॉस्पिटल, अमळनेर येथे पार पडलेली ही यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे याच सर्व गुणांचा सुंदर संगम आहे. एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात आलेले मोठे वैद्यकीय संकट दूर करण्यासाठी डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेले परिश्रम हे खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहेत.या आव्हानात्मक रुग्णसेवेच्या माध्यमातून अमळनेरच्या आरोग्यसेवा क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.या अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रियेत यश संपादन केल्याबद्दल डॉ. जयेश शिंदे आणि सुखांजनी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन होत आहे.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वासही महत्वाचा
अतिविशाल गर्भाशयातील फायब्रॉइडची ही समस्या अत्यंत गुंतागुंतीची होती. एवढी मोठी गाठ गर्भाशयापासून सुरक्षितपणे अलग करून शस्त्रक्रिया करणे ही खरोखरच आमच्यासाठी एक मोठी वैद्यकीय जोखीम आणि आव्हान होते. या शस्त्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक नियोजन, अचूक निर्णय आणि विशेष वैद्यकीय कौशल्याची आवश्यकता होती. मात्र, भगवंताच्या कृपेने मी आणि माझ्या संपूर्ण वैद्यकीय टीमने अथक परिश्रम, एकजूट, समन्वय आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.
डॉ.जयेश शिंदे
संचालक- सुखांजनी हॉस्पिटल अमळनेर
















