
अमळनेर (प्रतिनिधी) – अनधिकृत नळ कनेक्शनचा पंचनामा करताना नगर परिषदेच्या पाणी पुरवठा अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना दमदाटी करून हाकलून लावले, आदेशही फाडून टाकल्याप्रकरणी चार जणाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजाराम नगरमध्ये काहि लोकांना पाणी मिळत नव्हते, तर काहिंना गढूळ पाणी मिळत होते. २२ ऑक्टोबरला अमळनेर नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता सत्यम पाटील, विजय विसावे, राजेंद्र हडपे, गणेश पाटील, कमरोद्दीन शेख व कंत्राटी कर्मचारी परेश उदेवाल हे दुपारी राजाराम नगरमध्ये गढूळ पाणी का येते ते शोधायला गेले होते. या वेळी गळती व अनधिकृत नळ जोडणीची ते पाहणी करत होते. या वेळी त्यांना दाऊत पिंजारी व भानुदास पाटील यांच्या घराशेजारी मोठ्या जलवाहिनीवर अवैध नळ कनेक्शन आढळले. त्याचा पंचनामा करत असताना तेथे गौरव पाटील, हर्ष पाटील व नीलेश (पूर्ण नाव माहीत नाही) हे आले व त्यांनी जाब विचारले. त्यावर पथकाने कामाची माहिती दिल्यावर दाऊत पिंजारी वकिली पोशाखात आले व मी हायकोर्टात वकील आहे, तुमची नोकरी खाऊन जाईल. तुमच्यावर मानहाणीचा दावा करेल, असा दम दिला. त्यावर सत्यम पाटील यांनी तुमच्याकडे अवैध नळ कनेक्शन आढळले आहे, असे सांगितले. तर, दोन नळ कनेक्शनच्या पावत्या असतील तर दाखवा, असे सांगितल्यावर पिंजारी यांनी कोणताही आदेश दाखवला नाही. उलट अवैध नळ कनेक्शन शोध मोहिमेच्या त्यांच्या कामाचा आदेश फाडून टाकला. त्यांनतर गौरव, नीलेश व हर्ष यांनी आधी दूषित पाण्याचा बंदोबस्त करा, असे सांगत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच धक्काबुक्की करुन शिवीगाळही केली. गौरव पाटील यांनी सत्यम पाटील यांची कॉलर पकडून लोकांना भडकवले. त्यावेळी पथकाने अवैध नळ जोडण्या गटारीच्या शेजारीच आहेत. त्यामुळेच गढूळ पाणी येते, ठेकेदाराला याबाबत सूचना दिल्या आहेत. परंतु त्यांनी दबाव टाकत पथकाला हाकलून लावले. पथकाने दाऊत पिंजारी, भानुदास त्र्यंबक पाटील व रवींद्र फकिरा थोरात यांच्याकडे अवैध नळ कनेक्शन असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. वरिष्ठांच्या आदेशाने चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. प्रमोद पाटील करत आहेत.

















