
जळगाव (प्रतिनिधी) -: भरधाव वेगाने येणाऱ्या कारसह मालवाहू रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रिक्षासह कार रस्त्याच्या कडेला उलटून रिक्षाचालक इब्राहीम रहीम पिंजारी (वय ३५, रा. उस्मानिया पार्क) हा गंभीर जखमी झाला. तसेच कारमधील दोघांना किरकोळ दुखापत झाली. जखमी तिघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघाताची घटना मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी कानळदा रस्त्यावर घडली.
शहरातील उस्मानिया पार्कमध्ये राहणारे इब्राहीम पिंजारी हे मालवाहू रिक्षाचालक आहे. मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ते कानळदा येथे साहित्य घेवून गेले होते. कानळदा येथून जळगाव शहराकडे येत होते तर जळगावकडून राहुल रमेश पाटील (वय ३८, रा. वाल्मीक नगर) व चालक हे कारने किनोद येथे जात होते. त्या वेळी दोघ भरधाव वाहनांची कानळदा रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. रिक्षाचे चाक निखळण्यासह ती पूर्णपणे दाबली गेली. यात चालक इब्राहीम पिंजारी यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारमधील चालकासह अन्य एक जण जखमी
कारमधील राहुल पाटील यांच्या डोक्याला, हात व पायाला मार लागला असून कार चालकाही दुखापत झाली. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.















