
जळगाव (प्रतिनिधी) – कामाच्या बिलांवर सही करुन पुढील मंजूरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्याच्या मोबदल्यात बाधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतिष मनसुलाल शिसोदे (वय ५५, रा. आदर्शनगर) व कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे (वय ३२) यांनी दहा हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ मध्ये गाव अतंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे ९ लाख ९० हजार रुपयांचे काम केले आहे. या कामांची एमबी (मोजणी पुस्तीका) व बिले तयार करण्याकरीता स्थापत्य अभियंता भागवत चवरे यांनी यापुर्वी २० हजारांची लाच स्विकारली आहे. त्यानंतर तक्रारदार हे उपविभागीय अधिकारी कार्यालयात बिले मंजूर न झाल्यामुळे त्याची विचारपुस करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गेले होते. त्यावेळी अभियंता चवरे यांनी बिलांवर सही करुन पुढील मंजूरीसाठी जिल्हा परिषद येथे पाठविण्याच्या मोबदल्यात बिलाच्या दीड टक्के प्रमाणे १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
बिलाच्या १ टक्के प्रमाणे स्विकारली लाच
बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्यासाठी १५ हजारांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तडजोडअंती १ टक्क्याप्रमाणे दहा हजारांची लाच स्विकारतांना भागवत चवरे यांना सापळा रचून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले
शिसोदेकडून ९१ हजार तर चवरेकडून २० हजारांची रोकड हस्तगत
लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर भागवत चवरे यांनी त्यांनी रक्कम उपविभागीय अधिकारी सतिष शिसोदे यांच्याकडे दिली होती. अंगझडतीमध्ये शिसोदे यांच्याकडून मोबाईल आणि ९१ हजार ६२० रुपयांची रोकड तसेच भागवत चवरे याच्याकडून मोबाईल आणि २० हजार ६०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















