
जळगाव (प्रतिनिधी) – गावात जात असतांना विनाकारण दोघांनी निलेश भाई दास बाविस्कर (वय ४३, रा. तानाजी मालुसरे नगर) याला बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १६ ऑक्टोंबर रोजी मायक्का देवी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात दि. ३१ ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तानाजी मालुसरे नगरात निलेश बाविस्कर हे वास्तव्यास असून दि. १६ ऑक्टोंबर रोजी दुचाकीने मायक्कादेवी मंदिराजवळून गावात जात होते. यावेळी विनाकारण त्यांना अज्ञात दुचाकीस्वारांनी मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कपाळावर आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी दि. ३१ ऑक्टोंबर रोजी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित चेतन राजेंद्र शिंदे व रोहन राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ उपनिरीक्षक रघुनाथ पवार हे करीत आहे.
















