
जळगाव, (प्रतिनिधी) : ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी मी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढा उभा केला. पोलीस ठाण्यात तक्रार दिली, सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली, नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी ठाम साथ दिली आणि आमदार राजूमामा भोळे यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. अखेर १ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला.
अटलांटा कंपनीशी संबंधित ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही तपासासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास महापालिका प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने वारंवार पत्रव्यवहार करूनही कागदपत्रे उपलब्ध होत नसतील, तर त्यामागचे कारण काय? अटलांटा कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाचा पाठपुरावा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढा उभारल्याचे देशमुख यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची दखल घेतली, तर मंत्री गिरीश महाजन यांनी ठाम साथ दिली. आमदार राजूमामा भोळे यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाले. या प्रयत्नांनंतर अखेर १ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती मिळणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही कागदपत्रे नेमकी कोणाकडे आहेत? ती पोलिसांना का दिली जात नाहीत? कागदपत्रे देण्यास विलंब करण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
जळगावकर नागरिक शहराच्या विकासासाठी नियमित कर भरतात. त्यांच्या कष्टाच्या पैशांशी संबंधित एवढ्या मोठ्या प्रकरणाचा तपास कागदपत्रांअभावी रखडत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व आवश्यक कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करावीत आणि तपासाला पूर्ण सहकार्य करावे. जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी ठाम भूमिका देशमुख यांनी महापालिकेच्या सभागृहात मांडली.
नागरिकांच्या पैशांचा हिशेब समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
















