
पाळधी, शहाबाज देशपांडे (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पाळधी येथे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात धरणगाव तालुक्यासह परिसरातील ४०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पाळधी पोलीस दूरक्षेत्रात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पणही गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत शुगरवाल, धरणगावचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड आणि पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















