
धरणगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी धरणगाव येथील स्वामी विवेकानंद नागरिक पतपेढीचे संस्थापक चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा कायदा आघाडीचे उपाध्यक्ष ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी इतर सहकारी संस्था मतदारसंघ तसेच ओबीसी मतदारसंघातून संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप अण्णा धनगर, जळगाव येथील तेली समाजाचे कार्यकर्ते उमेश चौधरी यांच्यासह इतर सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ॲड. वसंतराव भोलाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
















