
अमळनेर (प्रतिनिधी ):- नवरात्रीच्या नवरंगातून प्रतीत होणारे सकारात्मकता, समृद्धी, सामर्थ्य, समर्पण, स्नेह, समतोल, संयम, संस्कार आणि सेवा हे अर्थपूर्ण जीवनाचे मौलिक नवरंग आहेत, असे भावपूर्ण प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी केले. मराठी वाङ्गय मंडळातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या उद्घाटनदिनी ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयावर त्यांनी प्रथम पुष्प गुंफले.
याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी उद्घाटन करून मनोगतात मराठी वाङ्गय मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराच्या काळात वाचनसंस्कृती, प्रत्यक्ष संवाद आणि सामाजिक सहभाग जपणे आवश्यक असल्याचे सांगून तरुणांनी तंत्रज्ञानासोबतच प्रत्यक्ष जगातील अनुभवांनाही महत्त्व द्यावे, असे आवाहन केले.यावेळी नगराध्यक्ष डॉ परिक्षीत बाविस्कर,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, कृ ऊ बा संचालक सुषमा देसले म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रारावीकर यांनी अनेक काव्यपंक्ती, किस्से, कथा, उद्बोधक वाक्ये परिपूर्ण अशा ओघवत्या शैलीत त्यांनी आपले विचार मांडले. विचारांची योग्य दिशा आयुष्याचा प्रवाह सुखकर करतो, असे सांगून ज्ञानाचे महत्व त्यांनी विशद केले. चार पुरुषार्थ, यशस्वी जीवनाची सूत्रे, समय, समृद्धी आणि सामर्थ्य यांचा कौशल्याने विनियोग, साहित्य, संगीत यांचे महत्व, सदगुणांचा अवलंब, दातृत्व, उपासना आणि माणसे जोडणे यांचे महत्व असे विविधांगी विवेचन त्यांनी केले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणार् या छोट्या छोट्या यशाचा उत्सव साजरा झाला पाहिजे. व्यवसायात कामाशी जोडलं जाणं, सर्वत्र माणसांशी जोडलं जाणं आणि उपासनेमध्ये परमेश्वराशी जोडलं जाणं अशी संपूर्ण जीवन ही जोडण्याची यात्रा आहे असे ते म्हणाले. समतोल, संयम, समाधान, संस्कार आणि सेवा ही सकारात्मकतेची पंचसूत्री त्यांनी मांडली. व्याख्यानाच्या प्रारंभी त्यांनी मराठी वाङ्गय मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच खानदेशी संस्कृतीचा गौरव करतांनाच अहिराणी भाषेत काही वाक्ये बोलत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा श्याम पवार व भैय्यासाहेब मगर यांनी तर आभार भैय्यासाहेब मगर यांनी मानले.















