
भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांचा अवैध व्यापार करून सामान्य प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या दलालांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा फास आवळला आहे. ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत ८ व ९ ऑक्टोबर रोजी जळगाव आणि पाचोरा येथे केलेल्या स्वतंत्र कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ९७ हजार २५१ रुपये किमतीची भविष्यातील प्रवासाची ४६ आणि यापूर्वीच्या प्रवासाची १८, अशी एकूण ६४ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे वैयक्तिक आयआरसीटीसी खात्यांचा गैरवापर करून सुरू असलेला तिकीटविक्रीचा प्रकार उघड झाला आहे.
पाचोरा आरपीएफ चौकीच्या हद्दीत ८ ऑक्टोबर रोजी विनायक बापू वाघ (वय ३६, रा. जारगाव, ता. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. वैयक्तिक आयआरसीटीसी यूजर आयडीचा वापर करून तो प्रवाशांना रेल्वे तिकिटे उपलब्ध करून देत होता. तिकिटाच्या मूळ भाड्याव्यतिरिक्त ५० ते १०० रुपये अधिक घेतल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ४९ हजार ८०० रुपये किमतीची ३८ ई-तिकिटे आणि मोबाइल जप्त केला. उपनिरीक्षक रोहिताश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
दुसरी कारवाई ९ ऑक्टोबर रोजी जळगाव आरपीएफने केली. मोहंमद अयाज मोहंमद फारुख (वय ४४, रा. भुसावळ) याची चौकशी केली असता, मोबाइलवरून आयआरसीटीसीच्या पाच वैयक्तिक यूजर आयडींचा वापर करून तिकिटे काढल्याचे समोर आले. त्याच्याकडून ४७ हजार ४५० रुपये किमतीची २६ ई-तिकिटे, तीन मोबाइल आणि संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक प्रफुल्ल खर्चे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
रेल्वे आरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच उपकरणावरून पाच ते सहा वैयक्तिक यूजर आयडींचा वापर केला जात असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. तत्काळ आणि आगाऊ आरक्षणाच्या माध्यमातून तिकिटे काढून ती सामान्य प्रवाशांना अतिरिक्त कमिशन घेऊन उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप आहे. तिकिटामागे ५० ते १०० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचेही समोर आले आहे.















