
जळगाव (प्रतिनिधी) – रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपीला जळगाव रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शामनगर परिसरात राहणारे किरण नंदकिशोर वासेवाय हे १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. १५ नोव्हेंबर रोजी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कुलूप-कोंडा तोडलेला दिसला. घरात तपासणी केली असता कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, ४३ इंची टीव्ही आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून राजीव गांधी नगर परिसरातील शक्तीसिंग ऊर्फ हग्गू जीवनसिंग जुन्नी याचा सहभाग निष्पन्न केला. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र, हग्गूसिंग पोलिसांना मिळून येत नव्हता.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांना हग्गूसिंग जळगाव रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि पथकाने तातडीने रेल्वे स्थानक गाठून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हग्गूसिंगला ताब्यात घेतले. अटकेनंतर चौकशीत त्याने सुबेरसिंग राजुसिंग टाक आणि शेरुसिंग सोजीतसिंग भोंड (दोघे रा. आत्महत्या कॉलनी, जळगाव) यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेऊन चौकशी केली असता चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा गोफ, ब्रासलेट, तोरड्या, चांदीचे देव, कडे, फुलपात्र तसेच सॅमसंग कंपनीचा ४३ इंची टीव्ही यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील सुबेरसिंग टाक आणि शेरुसिंग भोंड हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, संजय तडवी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
















