
नाशिक, (प्रतिनिधी) : गोवर्धन शिवारात एका ७० वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या घरात भरदिवसा घुसून मारहाण करत १० हजार रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. पैसे लुटल्यानंतरही संशयिताने ब्लेड स्वतःच्या मनगटावर ठेवून आत्महत्येची धमकी देत आणखी पैशांची मागणी केली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवर्धन गावातील रहिवासी नलिनी मोरेश्वर नावरेकर (७०) या त्यांचे बंधू श्रीकांत नावरेकर आणि वहिनी संध्या यांच्यासोबत राहतात. शनिवारी (दि. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास नलिनी घरात एकट्या असताना अंदाजे २५ ते ३० वर्षांचा अनोळखी तरुण बळजबरीने घरात शिरला. त्याला बाहेर जाण्यास सांगितल्यावर संशयिताने नलिनी यांचा गळा पकडून त्यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर गळा दाबत हिंदी भाषेत धमकावून पैशांची मागणी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या नलिनी यांनी घरातील सुमारे १० हजार रुपयांची रोकड त्याला दिली.
रोकड मिळाल्यानंतरही संशयित घरातील पलंगावर बसून खिडकी आणि दरवाजातून बाहेर डोकावत राहिला. त्यानंतर हातातील ब्लेड स्वतःच्या मनगटावर ठेवून आत्महत्या करण्याची धमकी देत आणखी पैसे मागितले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या नलिनी यांनी प्रसंगावधान राखत मागच्या दरवाजाने घराबाहेर पळ काढला.
महिलेच्या मागे संशयित धावला; मात्र नलिनी यांनी बाहेरील दरवाजाची कडी लावून घेतली आणि धावत जाऊन बंधू व वहिनीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संशयित पसार झाला होता.
या घटनेत जखमी झालेल्या नलिनी नावरेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
















