
धुळे प्रतिनिधी : राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पवार कुटुंबीयांच्या क्रूझर गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. मात्र, या भीषण अपघातातून १० वर्षांचा जगदीश पवार बचावला. त्याच्या बचावण्यामागे त्याने केलेला एक छोटासा हट्ट कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या अपघातात त्याने आई, वडील आणि बहिणीला गमावले असून, त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
३६ नातेवाईक देवदर्शनासाठी गेले होते
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील पवार कुटुंबातील नातेवाईक देवदर्शनासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या यात्रेला गेले होते. एकूण ३६ जण तीन वेगवेगळ्या क्रूझर गाड्यांमधून १७ नोव्हेंबर रोजी घरातून निघाले होते. या यात्रेदरम्यान त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर, सालासर बालाजी आणि खाटू श्यामजी अशा विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले.
खाटू श्यामजींचे दर्शन झाल्यानंतर सर्वजण धुळ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, या प्रवासात एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
उभ्या ट्रकला क्रूझरची जोरदार धडक
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. पवार कुटुंबीयांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासानुसार, वाहनचालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एका हट्टामुळे जगदीशचा जीव वाचला!
या अपघातातील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे १० वर्षांच्या जगदीश पवारची कहाणी. प्रवास सुरू झाल्यानंतर जगदीश आई-वडिलांसोबत गाडीच्या पुढील बाजूला बसला होता. मात्र, काही वेळाने त्याने मागच्या सीटवर जाऊन बसण्याचा हट्ट धरला. त्याच्या या हट्टामुळे तो मागच्या बाजूला जाऊन बसला.
काही वेळातच गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पुढील बाजूस असलेल्या त्याच्या आई-वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाला. मात्र, जगदीश या अपघातातून बचावला. एका लहानशा हट्टामुळे त्याला जीवनदान मिळाले; पण त्याच क्षणी त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले.
नऊ जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांचे पार्थिव धुळे जिल्ह्यात आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला. संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. शोकाकुल वातावरणात नऊही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने अमराळे गावासह संपूर्ण धुळे जिल्हा सुन्न झाला आहे.
जगदीशच्या भविष्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडून
या भीषण अपघातातून बचावलेल्या जगदीशच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचे आई-वडील आणि बहीण या तिघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे या चिमुकल्याच्या शिक्षणाची आणि भविष्यातील संगोपनाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जगदीशच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याची घोषणा केली आहे. दुःखाच्या प्रसंगी या निर्णयामुळे जगदीशच्या भविष्याला आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
एका बाजूला देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याचे स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला एका क्षणात उद्ध्वस्त झालेले संपूर्ण कुटुंब… जगदीशच्या आयुष्यातील ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. एका हट्टामुळे त्याचा जीव वाचला; मात्र आई-वडील आणि बहिणीची साथ कायमची सुटल्याने त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
















