
पाळधी/जळगाव (प्रतिनिधी) : समाजसेवा म्हणजे केवळ मोठमोठ्या घोषणा नव्हेत, तर गरज ओळखून माणसाच्या मदतीला धावून जाणे होय. तहानलेल्या वाटसरूला शुद्ध पाण्याचा घोट आणि थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूला मायेची ऊब देण्यातच खरी माणुसकी आहे. माणसाच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारी माणसं हीच समाजाची खरी संपत्ती आहे. जीपीएस मित्र परिवाराने सेवाभाव केवळ शब्दांत न ठेवता आपल्या कृतीतून जपला आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट हे होते.*
पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात जीपीएस मित्र परिवाराच्या पुढाकारातून व ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फिल्टर वॉटर मशीनचे लोकार्पण व ब्लॅंकेटचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाळधी हे प्रमुख वाहतुकीचे केंद्र असल्याने येथून दररोज ये-जा करणारे प्रवासी, वाहनधारक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. याचवेळी थंडीच्या पार्श्वभूमीवर निराधार व गरजू नागरिकांना ब्लँकेटचेही वाटप करण्यात आले.
प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वातून सेवाकार्याचा विस्तार
समाजकार्याचा ध्यास आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्परता, हीच जीपीएस मित्र परिवाराची ओळख बनली आहे. युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूक्ष्म नियोजनातून या परिवाराचे सेवाकार्य सातत्याने विस्तारत आहे. आरोग्य शिबिरे, हजारो गरजू रुग्णांना मोतीबिंदू उपचारासाठी मदत, निराधारांसाठी भोजन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच गरजूंना उबदार कपड्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांतून जीपीएस मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देत गरजवंतापर्यंत मदत पोहोचविण्यावर प्रतापराव पाटील यांचा भर असतो. याच सेवाभावी वाटचालीत आता सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची भर पडली आहे.
शरदचंद्र कासट यांच्या दातृत्वाचा आदर्श !
या लोकोपयोगी उपक्रमासाठी सहकार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट यांच्या दातृत्वाचा यावेळी गौरव करण्यात आला. व्यवसायाबरोबरच समाजभान जपणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या योगदानाचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत झंवर यांनी केले तर आभार माजी सरपंच अरुण पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
युवा नते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील , ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट, उद्योजक अनिल कासट, माजी सरपंच अरुण पाटील, शेतकी संघाचे गजानन पाटील, तालुका संघटक रवी चव्हाण सर, प्रशांत झंवर , मा,सरपंच अरुण पाटील ,गुलाब माळी, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत इंगळे, अनिल सोनवणे, दिलीप माळी, मुकेश भोई, चेतन झंवर ,किरण माळी, राजू चौधरी यांच्यासह जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य व पाळधीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












