
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोराडखेडा येथे शेतीच्या व्यवहारासाठी आलेल्या कन्नड येथील ५२ वर्षीय व्यावसायिकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची शेतीच्या व्यवहारातून हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे वैद्यकीय क्षेत्रासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांच्या मालकीची दोन एकर जमीन एक कोटी दोन लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचे त्यांनी निश्चित केले होते. या व्यवहारापोटी त्यांनी राहुल पाटील यांना ८० लाख बयाणा दिला होता.
दि.१७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे कन्नड येथून मुलीसह चारचाकी वाहनाने निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे आपल्या शालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी प्र.लोद येथील घरी परतून तीन लाख दहा हजार रुपये घरी ठेवले व उर्वरित एक लाख ९० हजार रुपये घेऊन दि.१८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील यांच्याकडे गेले. शेतीच्या व्यवहारातून घडलेल्या या हत्याकांडामुळे गोराडखेडा परिसरासह पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शाब्दिक वादातून लोखंडी रॉडने हल्ला
जमीन व्यवहारावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून जवळच असलेल्या बहुळा धरणात फेकल्याची कबुली दिल्याचे समजते.
सहा दिवसांच्या तपासानंतर हत्येचा उलगडा
डॉ. संजय तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाइकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध लागण्यासाठी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांकडून सुरू होता. अखेर तपासाअंती राहुल धर्मराज पाटील व त्याच्या सालदाराने संगनमताने खून केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
बहुळा धरणावर रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम
संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपासून बहुळा धरणात डॉ. संजय तेली यांचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांना बंदोबस्त राखण्यासाठी कसरत करावी लागली. यावेळी आरसीपी प्लाटूनसह पाचोरा पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
















