
जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या अभय योजनेचा लाभ अधिकाधिक थकबाकीदार वीजग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव शहरात बुधवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अभय योजनेची माहिती देत थकबाकीमुक्त होण्याची संधी साधण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्त जी.टी. महाजन, अनिल पाटील, राजेश नेमाडे, सुरेंद्र उन्हाळे, उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे, दिलीप मराठे यांच्यासह रॅलीत महावितरणच्या जळगाव विभागातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील बसस्थानक चौक, कोर्ट चौक, नेहरूनगर, आसोदा रोड, कांचन नगर आणि जुने जळगाव या प्रमुख भागांतून रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान अभय योजनेचे महत्त्व, योजनेतील सवलती आणि ग्राहकांना मिळणारे आर्थिक फायदे यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. थकीत वीजबिलांचा प्रश्न निकाली काढून वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली.
व्याज व विलंब आकाराला १०० टक्के माफी
१५ जानेवारी २०२७ पर्यंत अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले अकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले पात्र ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, १५ डिसेंबर २०२६ पूर्वी मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या कालावधी व ग्राहक वर्गवारीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे. पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्कही माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
















