
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे परिसरात चार पाच जनावरे फस्त करणाऱ्या बिबट्याने संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण केली होती. वनविभागाने त्यांचा मागोवा घेत त्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावले होते. १६ रोजी पहाटे बिबट्या पिंजारी मुस्लिम कब्रस्थान मधील पिंजऱ्यात कैद झाला आहे.
शिरूड , मंगरूळ, पिंपळे ,ढेकू रस्ता ,धार रस्ता ,अंतुर्ली रंजाणे , ताडेपुरा ,टाकरखेडा परिसरात बिबट्याचा वावर होता. वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण , उपवनसंरक्षक राम धोत्रे ,सहाययक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुलाब पिंजारी वनरक्षक, दुर्गादास वानखेडे , योगेश पाटील , मनीषा मोरे , वनमजुर प्रवीण पाटील ,समाधान पाटील , मयुर पाटील दररोज गस्त घालून विविध ठिकाणी पिंजरे लावत होते. पिंजऱ्यामध्ये बिबट्याला शिकारीसाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी शेळ्या दिल्या होत्या. सरपंच सचिन पाटील यांनीही सहकार्य केले होते
बिबट्या विविध ठिकाणी भटकत होता म्हणून वनपाल गुलाब पिंजारी दररोज रात्री उशिरापर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांसह आणि पहाटे गस्त घालत होते. त्याचा वावर पाहून तेही पिंजऱ्याची जागा बदलवत होते. अखेरीस १६ रोजी पहाटे तांबेपुरा अंतुर्ली रस्त्यावर असलेल्या पिंजारी मुस्लिम कब्रस्थान मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून बिबट्या कुठे सोडायचा याबाबत ते निर्णय घेणार आहेत.
















