
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मांडळ येथील ‘हात सर्वांचा विकास गावाचा’ हा व्हाट्सॲप ग्रुप २०१६ पासून गावात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी दीपावलीनिमित्त गावात तसेच बाहेरगावी नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या सदस्यांच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी कार्ये केली जातात.
जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना साहाय्य, तसेच गावातील यशवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार असे कौतुकास्पद उपक्रम या ग्रुपमार्फत सातत्याने राबवले जातात.
यंदाही या उपक्रमांतर्गत २५ सेवानिवृत्त शिक्षक,२० गुणवंत विद्यार्थी आणि 2 विशेष सन्मानित व्यक्तींचा सत्कार सोहळा १२ रोजी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात गावातील पत्रकार सुरेश कांबळे यांचा माजी सरपंच मनोहर पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिकन पाटील यांनी भूषवले. यावेळी जगदीश पाटील, किरण बडगुजर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रुपचे ॲडमिन योगेश वानखेडे आणि तृप्ती वानखेडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुरलीधर कोळी यांनी केले.













