
जळगाव (प्रतिनिधी) – सेवा संकल्प अभियान हे केवळ महिन्याभरापुरते मर्यादित न राहता त्यातील गतिमानता आणि ग्राहकाभिमुख सेवेची संस्कृती महावितरणच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कायमस्वरूपी अंगीकारावी, असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (दि. १५) केले. या अभियानात प्रत्येक तालुक्यात एकाच ठिकाणी सर्व ग्राहकसेवा व विविध योजनेतील सहभागाची सुविधा उपलब्ध होत आहे. त्याचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री. लोकेश चंद्र यांनी कल्याण, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, भांडूप व पुणे येथील विशेष सेवा कक्षांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या अभियानाला वीजग्राहकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अभियानातील गतिमानता कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर, ग्रामीण विद्युतीकरण कॉरपोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. सौम्या कांत, महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत व श्री. चंद्रमणी मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त महावितरणकडून प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारून येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रातिनिधिक स्वरूपात काही परिमंडलांचा आढावा घेतला. यावेळी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप, नवीन वीजजोडणी, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजनेचे प्रातिनिधिक लाभार्थी सुशील जयप्रकाश पाटील (नवापूर, विरार), गजराबाई सुला वरडे (नाशिक शहर), आनंद सरदेशमुख (पुणे शहर), धीरज पत्रू नैताम (तळोदी, ता. चामोर्शी, जि. चंद्रपूर), गजानन घाग व बाळासाहेब नदाफ (कोल्हापूर शहर), सुनील रामभाऊ बरड (सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड) तसेच बँक प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. ‘महावितरणच्या विशेष सेवा कक्षांद्वारे केलेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही झाली. बॅंक प्रतिनिधी त्याच ठिकाणी असल्याने कर्जाची जागवेरच सोय झाली आणि योजनेचा लाभ मिळाला’ असे मनोगत लाभार्थ्यांनी व्यक्त केले.
मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले, की येत्या मार्चपर्यंत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजने अंतर्गत राज्यातील दारिद्ररेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ५ लाख घरगुती वीजग्राहकांच्या छतावर एक किलोवॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. तर शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानासोबतच राज्य सरकारकडून दहा हजार रुपये अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे. ऊर्वरित रक्कम भरून स्मार्ट योजनेचे लाभार्थी सुमारे २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकणार असल्याचे श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले.
या संवाद कार्यक्रमाला मुख्य अभियंते श्री. पंकज तगलपल्लेवार (मुख्यालय), श्री. सुंदर लटपटे (नाशिक), श्री. हरिश गजबे (चंद्रपूर), श्री. संजय पाटील (भांडूप), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर), श्री. ज्ञानदेव पडळकर (प्रभारी-पुणे), श्री. रवींद्र आव्हाड (प्रभारी-कल्याण) आदींसह वरिष्ठ अभियंते, अधिकारी, बॅँक प्रतिनिधी तसेच वीजग्राहक व लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

















