
जळगाव (प्रतिनिधी) – रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज लांबविणारा गोकुळ सुरेश बागडे (वय ३६, रा. कंजरवाडा) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील नवीन जोशी कॉलनीतील शिवशंकर नगरात विवेक पांडुरंग जोशी (वय ४३) हे महावितरणमध्ये नोकरीला असून, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ते २५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० या वेळेत अज्ञाताने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला मार्गदर्शन केले.
साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून गोकुळ बागडे याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत २ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची पोत, ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ५ हजार रुपयांची दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, नितीन ठाकूर, राहुल घेटे, सुभाष साबळे यांच्या पथकाने केली.
















