
जळगाव, प्रतिनिधी : पुण्यातील बोपदेव घाट परिसरातील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग समोरील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात भरधाव आयशर ट्रक घूसून झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी अंत झाला होता. यामध्ये जळगावातील मोहीनी जितेंद्र चौधरी (रा. चंदू अण्णा नगर) या विद्यार्थीनीचा समावेश होता. या घटनेमुळे चंदू आण्णा नगरात शोककळा पसरली असून गुरुवारी सायंकाळी या विद्यार्थीनीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुण्यातील बोपदेव घाटातील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग समोरील बस स्टॉपवर विद्यार्थी बसची वाट पाहत उभे होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रक विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरुन त्याने काही विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात मोहिनी चौधरी हिच्यासह सिद्धेश राजे आणि विशाल दांगडे या अन्य दोन विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला.
महाविद्यालयासमोर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात अचानक भरधाव आयशर ट्रक घुसला आणि या तिघांना चिरडले. काळाने घातली विद्यार्थीनीवर झडप
मोहिनी ही शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास होती. नुकतीच ती दिवाळीनिमित्त जळगावला आपल्या घरी आली होती. दिवाळीच्या सुद्ध्या संपून महाविद्यालय सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा पुण्याला रवाना झाली होती. मात्र, काळाने तिच्यावर झडप घातल्याने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
















