
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील तुकाराम नगर परिसरातील स्वामी नारायण अपार्टमेंट आणि श्री श्री अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी एकाच दिवशी तीन बंद फ्लॅटचे कुलूप व कडी-कोयंडे तोडून तब्बल ५ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, या चोरीत तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर आणि ग्रामसेविका अशा तीन सुशिक्षित कुटुंबांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. इर्टिगा कारमधून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरात चोरट्यांनी आता भरदिवसाही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबरला सकाळी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डाव साधला. प्रमोद बाबुराव पांढरे (वय ५१) हे जळगाव येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी ९ वाजता ते आणि त्यांची पत्नी घराबाहेर गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटांची तपासणी करुन सोन्या-चांदीचे दागिने आणि ६५ हजारांची रोकड चोरून नेली. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती मिळताच पांढरे यांनी घरी धाव घेतली. काही वेळापूर्वी सुरक्षित असलेल्या घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तर, पांढरे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील डॉ. प्रवीण सुधाकर देशमुख यांच्या घरातही चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांच्या घरातून चांदीच्या वस्तू, शिक्के, करंडे रोकड आणि वाहनांच्या चाव्या असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच याच परिसरातील श्री श्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ग्रामसेविका मनीषा ज्ञानेश्वर बंड यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. त्यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्या-चांदीचे दागिने आणि नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. एकाच दिवशी तीन घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी तुकाराम नगर परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. पो. नि. राहुल वाघ यांनी चोरट्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. इटिंगा कारमधून आलेल्या संशयितांचा माग काढणे, तीनही चोरीच्या घटनांमधील परस्परसंबंध तपासणे आणि चोरट्यांना जेरबंद करणे, असे आव्हान पोलिसांसमोर आहे.
नियोजनबद्ध चोरीचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार संशयित चोरटे सात आसनी इर्टिगा कारमधून परिसरात आले होते. एकाच वेळी तीन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याने चोरट्यांनी आधीच परिसराची पाहणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, स्वामी नारायण अपार्टमेंटमधील आणखी एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे की काय, अशी चर्चा रहिवाशांमध्ये सुरू आहे.
















