
अमळनेर, प्रतिनिधी : शहरातील पारधीवाडा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानाजवळील कत्तलखान्यावर अमळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५७० किलो विविध जनावरांचे मांस, ५० किलो कातडी, शिंगे तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी २८ कुऱ्हाडी, सुऱ्या आणि कोयते जप्त करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना संबंधित कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांची धाड पडताच इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले. तर इतर संशयितांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी केली असता ३०० किलो गोवंश मांस, १०० किलो म्हशीचे मांस आणि अन्य १७० किलो मांस आढळून आले. याशिवाय जनावरांची हाडे, शिंगे, ५० किलो कातडी आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी २८ हत्यारे पोलिसांनी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४४ हजार ८०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जप्त केलेले मांस, हाडे, कातडी आणि शिंगे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खड्डा करून पुरून नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफ खा अजीज खा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला, इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वाजे यांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.
















