
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शाम नगर परिसरात कुलूप बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजा कडीकोयंडा कटरच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी घरातून रोकडसह मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या. ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरी झालेल्या एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झाले आहे. दोन घरांतील कुटुंबिय बाहेर गावी गेल्यामुळे नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील शाम नगरातील एकाच लाईनमध्ये असलेले तीन घरे कुलूप बंद होते. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यात टोपी, तोंडाला मास्क आणि हातमोजे घालून आलेले तिघे परिसरात शिरले. त्यांनी कटरच्या सहाय्याने कुलूप, कडीकोयंडा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले आणि कपाटांचे लॉकर उघडून त्यातील ऐवज घेऊन पसार झाले. या तीन घरांपैकी एक घर मालक रविवारी संध्याकाळी घरी आले. त्यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड गेल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. तर अन्य दोन घरमालक बाहेरगावीच असल्यामुळे त्यांच्या घरातील
किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. तसेच ते दोघ घरमालक हे सोमवारी परतणार असून त्यानंतरच किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट होईल.
शिट्टी वाजल्यामुळे चोरटे पसार
एकाच लाईनत असलेल्या तीन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दरम्यान, ज्या घरांमध्ये चोरी झाली त्यांच्या घराच्या बाजूला सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राहतात. आवाज झाल्यामुळे त्यांना जाग आली. दरम्यान, त्यांनी शिट्टी वाजविताच आवाज ऐकून तिघे चोरटे तेथून पसार झाले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
ऐवज चोरुन चोरटे पसार झाल्यानंतर घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत तक्रार न दाखल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
चोरटे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरी करण्याकरीता या परिसरात आले. ते बॅटरीच्या प्रकाशामध्ये एका घराचा कटरच्या सहाय्याने कडीकोयंडा तोडून आत शिरले. तिघांपैकी एक जण हा दरवाजा जवळ उभा राहून बाहेर लक्ष देत असल्याचे त्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार पोलिसांकडून संशयित चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
















