
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामीण भागातून टायपिंग क्लाससाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना १३ रोजी दुपारी दोन वाजता स्वामी समर्थ मंदिर प्रवेशद्वाराजवळ घडली होती. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पीडित तरुणीने फिर्याद दिली की, दोन महिन्यांपूर्वी कचरे येथील एका तरुणासोबत ती सोबत स्पर्धा परिक्षेच्या क्लासला होती. तर, तरुणाने तिच्या नोट्स नेल्या होत्या. त्यावेळी त्याने तू मला आवडते माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असा आग्रह धरला होता. पुन्हा, १३ रोजी दुपारी दोन वाजता पीडित तरुणी टायपिंग क्लासला गेली असताना तरुण दुचाकीवर आला आणि त्याने तरुणीचा उजवा हात पकडून विनयभंग करत, तुला सोडणार नाही, असा दम दिला. त्यावेळी तरुणीने आरडाओरड करेल असे सांगताच तरुण तेथून पळून गेला. त्यांनतर तरुणीने घरी जाऊन आपल्या आई, वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीने अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास हे. कॉ. विनोद भोई करत आहेत. दरम्यान, दिलेली फिर्याद खोटी असून या घटनेच्या दिवशी मी मुंबईला असल्याचे संशयित तरुणाने पोलिसांना सांगितले असून पोलीस चौकशी करीत आहेत. तसेच प्रताप महाविद्यालयाच्या परिसरातून एका २० वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने १६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत.
















