
भुसावळ (प्रतिनिधी) – लहानपणीच आईचे छत्र हरपलेले आणि वडील अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त… अशा प्रतिकूल परिस्थितीत वडिलांची काळजी घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला त्याच्यासाठी नेमलेल्या के अरटेकरनेच विश्वासघाताचा धक्का दिला. आजारी वडिलांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या पैशांवरच डल्ला मारण्यात आला. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच संपूर्ण ९१ हजार रुपये परत मिळवून दिल्याने या तरुणाला मोठा दिलासा मिळाला.
तनिष्क आकाश माखिजा (रा. शकुन इस्टेट, वांजोळा रोड) असे या तरुणाचे नाव आहे. तनिष्कच्या वडिलांना अर्धांगवायूचा आजार असल्याने त्यांच्या देखभालीसाठी त्याने केअरटेकरची नियुक्ती केली होती. मात्र, ज्या व्यक्तीवर वडिलांच्या काळजीची जबाबदारी सोपवली, त्यानेच दोन साथीदारांच्या मदतीने वडिलांचे क्रेडिट कार्ड वापरून परस्पर ९१ हजार रुपये लाटल्याचे समोर आले.
या प्रकारची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे यांनी कारवाई केली. पोलिसांनी संबंधित केअरटेकरसह त्याच्या दोन्ही साथीदारांना काही तासांतच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फसवणुकीतून घेतलेली संपूर्ण ९१ हजार रुपयांची रक्कम जप्त करून ती तनिष्कच्या स्वाधीन करण्यात आली.
















