
जळगाव (प्रतिनिधी) – दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादातून दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने अर्जुन रोहीदास राठोड (वय २५, रा. पंचमुखी हनुमान मंदिर) याच्यावर गावठी कट्टूयातून गोळीबार केला. ती गोळी अर्जुनच्या कानाच्या मागील बाजून अडकली असून त्याला उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहा वाजता गणेश नगरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध परस्परविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या अर्जुन राठोड याचे दोन दिवसांपुर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या हितेश गायकवाड उर्फ सामान, यश अंभोरे उर्फ सीके यांच्यासोबत वाद झाले होते. दि. १२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अर्जुन राठोड हा त्याच्या (एमएच १९, इके ००१३) क्रमांकाच्या दुचाकीवर त्याचा मित्र विशाल बागडे, आकाश भाट याच्यासोबत रिधम हॉस्पिटलजवळ उभा होता. त्यावेळी तिघ हल्लेखोर दुचाकीने त्याठिकाणी आले. त्यांनी दोन दिवसांपुर्वी झालेल्या वाद पुन्हा उकरुन वाद घालण्यास सुरुवात केली. सोबत असलेल्या विशाल बागडे व आकाश भाट यांनी तिघांना वाद न घालण्याबाबत समजाविले. परंतू दुचाकी बाजूला नेत असतांनाच यश अंभोरे व त्याच्यासोबतच्याने प्रोत्साहित केल्यामुळे हितेश गायकवाड उर्फ सामान याने त्याच्याजवळील गावठी कद्वयातून अर्जुन राठोडला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला.
जखमीला मुंबईला हलविले
गावठी कट्टयातून झाडलेली गोळी ही अर्जुनच्या कानामागे लागून अडकून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचाराकरीता मुंबई येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित हितेश गायकवाड उर्फ सामान, यश अंभोरे उर्फ सीके व अन्य एकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
डिक्कीतून कट्टा काढून लावला डोक्याला
दुसऱ्या गटातील यश अंभोरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन तो त्याचा मित्र हितेश गायकवाड आणि दबद्या नावाचा मित्र दुचाकीने जात असतांना रीदम हॉस्पिटलजवळ अर्जुन राठोड याने त्यांना शिवीगाळ केली. त्याला शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याने त्याने दुचाकीच्या डिक्कीतून गावठी कट्टा काढून तो यशच्या डोक्याला लावून त्याला मारहाण केली.
















