
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील निसार कॉलनीत मोबाईल रिपेअरींग करणाऱ्या शेख अनिस शेख चाँद (वय ३५) यांच्या घरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार असमतखा इलियासखा कुरेशी (रा. गेंदालाल मिल) याच्या शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेला २८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
शहरततील निसार कॉलनीत राहणारे मोबाईल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या शेख अनिस शेख चाँद यांच्या घरातून दि. ३ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करुन चोरट्याने चांदीचे पायल, दोन सोन्याच्या पोत व रोकड असा एकूण २९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोनि सागर शिंपी यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुनिल पाटील, सफौ दीपक शिरसाठ, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार, भगवान मोरे यांचे पथक रवाना केले.
रेल्वे स्टेशन परिसरातून आवळल्या मुसक्या
पथकाकडून संशयिताचा शोध घेत असतांना ही चोरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असमतखा इलियास खा कुरेशी याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. तो रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचे समजताच संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
खाक्या दाखविताच दिली कबुली
सुरुवातीला संशयित चोरटा उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतू त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली देत चोरलेला २८ हजारांचा मुद्देमाल काढून दिला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.

















