
वरणगाव, ता. भुसावळ ( प्रतिनिधी ) – दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या कारणावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले. वरणगावातील सिद्धेश्वर नगर परिसरात १२ ऑक्टोबरला रात्री १० वाजता तरुणाच्या भावावर लोखंडी रॉड आणि धारदार चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात कृष्णा संजय माळी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ जळगावातील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच जण फरार झाले आहेत.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, येथील सिद्धेश्वर नगरमदील गोपाळ संजय माळी (वय २४) याने दोन वर्षांपूर्वी शुभांगी यांच्यासोबत पळून जात प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. विवाहानंतर काही महिन्यांनी दोन्ही कुटुंबांत वाद झाले होते. त्यावेळी समझोता झाला असला, तरी त्यानंतरही कुरबुरी सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, सोमवारी रात्री गोपाळ माळी हा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्यावेळी त्याची पत्नी शुभांगी हिचा फोन आला अन् तिच्या नातेवाईकांनी भाऊ कृष्णा याच्यासोबत वाद घातल्याचे तिने सांगितले. त्यानंतर गोपाळ हा मित्रांसह घरी पोहोचला. तर घरासमोरील रस्त्यावर कृष्णा आणि शुभांगीच्या नातेवाईकांमध्ये भांडण सुरू होते. त्यावेळी गोपाळ हा भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना शुभांगीचा मामा सोपान धनगर याने कृष्णाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारल्याचा आरोप आहे. तसेच पवन धनगर याने खिशातून चाकू काढून कृष्णाच्या गळ्याच्या दिशेने वार
केला. कृष्णाने वार चुकवल्याने चाकूचा घाव त्याच्या चेहऱ्यावर लागला. धीरज धनगर यानेही कठोर वस्तूने मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय सागर धनगर, मयूर धनगर आणि नीलेश राखुंडे यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या शुभांगीलाही तिची आई मीराबाई धनगर आणि निर्मलाबाई धनगर यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. गोपाळचा मित्र हर्षल राजपूत यालाही मारहाण झाली. तर, पोलिस येत असल्याचे समजताच संबंधितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी कृष्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा तपास स.पो.नि. अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मंगेश बेंडकोळी, पो.कॉ. भूषण माळी, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, मनोज बनसोळे, सुखराम सावकारे करत आहेत.
पाच जणांचा शोध सुरू
या प्रकरणी गोपाळ माळी यांच्या फिर्यादीवरून सोपान पंडित धनगर, पवन धनगर, धीरज धनगर, निर्मलाबाई धनगर, मीराबाई धनगर, सागर धनगर, मयूर धनगर व नीलेश राखुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी १३ ऑक्टोबरला दुपारी १२.३९ वाजता सुदर्शन उर्फ पवन संजय बोरसे उर्फ धनगर (वय २३), सागर बापू धनगर (वय २६) व धीरज संजय बोरसे उर्फ धनगर (वय १८) या तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपी सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी आहेत. तर, सोपान धनगर, निर्मलाबाई धनगर, मीराबाई धनगर, मयूर धनगर, नीलेश राखुंडे या पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

















