
चाळीसगाव (प्रतिनिधी) -: शहरातील हिरापूर रोडवरील इच्छादेवी मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात चाळीसगाव शहर पोलिसांना यश आले आहे. मंदिरातील पितळी घंटा व पूजेचे साहित्य चोरी करणाऱ्या २२ वर्षीय संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून २१ हजार ७०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
इच्छादेवी मंदिराचे पुजारी संजू महाराज गोपालदास पागलदास (वय ५२) हे मंदिर परिसरात वास्तव्यास आहेत. १३ सप्टेंबरला अज्ञात चोरट्याने याच मंदिरातील पितळी घंटा व अन्य पूजेचे साहित्य असा सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी २६ सप्टेंबरला चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात पो.नि. अमितकुमार मनेळ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पो.उ.नि. संदीप घुले, पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, अंमलदार मोहन सूर्यवंशी, विलास पवार, दिलीप राक्षे, विकास पाटील व दत्तू सावळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान गोपाळ सुरेश माचे (वय २२, रा. ओस्तवाल हॉस्पिटलजवळ, चाळीसगाव) याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ११ हजारांची पितळी घंटा, ५ हजाराच्या तीन पितळी घंटा, २ हजार ७०० रुपयांच्या दोन पितळी घंटा, १ हजार ८०० रुपयांचे दोन तांब्याचे कलश, १ हजार २०० रुपयांचे पूजेचे साहित्य असा २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी गोपाळ माचे याला अटक केली असून तपास पो.हे.कॉ. राहुल सोनवणे करत आहेत.
















