
जळगाव (प्रतिनिधी) – फटाके फोडत असता फटाक्यांची चिंगारी उडून दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडल्या. मनपाच्या अग्निशमन विभागाने त्यावर लगेचच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटच्या जीन्याखाली ठेवलेल्या पेटीवरील जुन्या कपड्यावर चिंगारी उडाल्याने आग लागली. या आगीत प्लास्टिकची पेटी व जुने कपडे जळाले. दरम्यान, आगीमुळे अपार्टमेंटमध्ये धूर पसरल्याने गोंधळ उडाला होता. मनपाच्या एमआयडीसी व गोलाणी मार्केट या दोन्ही युनिटवरील पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले. दरम्यान, आग किरकोळ असल्याचे फायरमन रोहिदास चौधरी यांनी सांगितले.
मनपाच्या लाईट विभागातील कचऱ्याने घेतला पेट
गणेश कॉलनी परिसरातील विजय कॉलनीत मनपाचा लाईट विभाग आहे. येथे लहान मुलं फटाके फोडत होते. त्याची चिंगारी उडून या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला आग लागली. ही आगही अग्निशमन विभागाने आटोक्यात आणली.
















