
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेच्या सत्ताकारणातही महायुतीचा प्रयोग राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालकपदाची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे जलसंपदामंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी दिले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राजकीय पक्षीय समीकरणांऐवजी महायुतीच्या समन्वयाला प्राधान्य दिले जाण्याची चिन्हे आहेत.
जळगाव एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन्स येथे शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याची भूमिका मांडली. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील संबंधित मतदारांशी संपर्क साधून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला खासदार स्मिता वाघ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, नगरसेवक अरविंद देशमुख, माजी नगरसेवक मनोज काळे आदी उपस्थित होते.
जागावाटपासाठी तिन्ही पक्षांची स्वतंत्र बैठक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र येण्याची भूमिका स्पष्ट झाली असली, तरी प्रत्यक्ष जागावाटपाचे गणित अद्याप निश्चित झालेले नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये लवकरच स्वतंत्र चर्चा होणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार राहणार, याबाबत या चर्चेत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह पक्षांतर्गत राजकीय हालचालींनाही वेग येणार आहे.
दिवाळीनंतर आयुक्तांसोबत बैठक
दरम्यान, जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न आणि शहराशी संबंधित अन्य महत्त्वाच्या नागरी विषयांवर दिवाळीनंतर मंत्री गिरीश महाजन हे महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीचा सूर
जिल्हा बँकेपुरताच महायुतीचा समन्वय मर्यादित न ठेवता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसह २०२९ मधील निवडणुकाही महायुतीच्या माध्यमातून लढविण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकीय रणनीतीसाठी महायुतीच्या समन्वयाला महत्त्व दिले जात असल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले.
पाचोरा मतदारसंघातील अपिलावर मेरीटनुसार निर्णय
पाचोरा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातील उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या प्रकरणाबाबत विचारले असता, मंत्री महाजन यांनी या प्रकरणाची आपल्याला सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणात अपील दाखल करण्यात आले असून, त्यावर गुणवत्तेनुसार (मेरीटवर) निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयाचे संकेत
















