
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, हातभट्टी दारू निर्मिती आणि तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवली, त्यात एकाच महिन्यात राबवलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल ४४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासह २२२ गुन्हे दाखल करत १८७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गत अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या कारवाईमध्ये १८७ जणांविरुद्ध २२२ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या एकाच महिन्यात अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री करण्यासाठी वापरली जाणारी ८ वाहने देखील विभागाने जप्त केली आहेत. या पुढील काळात जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व तस्करी करणाऱ्याविरोधात कारवाईची मोहीम अधीक तीव्र केली जाणार आहे. तसेच कायदा मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
८५ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट
तयार दारूसाठा जप्त करण्याव्यतिरिक्त, अवैध हातभट्टी दारूच्या निर्मितीसाठी जंगलात आणि छुप्या ठिकाणी तयार करून ठेवण्यात आलेले तब्बल ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन घटनास्थळावरच नष्ट केले. दारूबंदी कायद्यांतर्गत २२२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून १८७ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
















