
जळगाव (प्रतिनिधी) – बंद दरवाज्याचे कुलुप तोडून घरात एन्ट्री करत चोरट्यांनी सोने व चांदीचे दागिने रोकड असा ९९ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील श्रीकृष्णनगरात मंगळवार दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अण्णा सखाराम जाधव (वय ३३, रा. श्रीकृष्णनगर) हे येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते सोमवारी दुपारी १२.३० वाजता दरवाजाला कुलुप लावुन कुटुंबासह गावी गेले. चोरट्यांनी ही संधी हेरली. बंद दरवाज्याचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकला. हाती लागलेला मुद्देमाल घेत चोरटे फरार झाले.
या घटनेत चोरट्यांनी ३१ हजार ५०० रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, नऊ हजारा रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १८ हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील लटकण, नऊ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाळी, नऊ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, नऊ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची मंगळसुत्र सोन्याचे मणी, चार हजार ५०० रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची चिप, १५०० रुपये किमतीची चांदीचे दोन भार वजनाचे दोन कडे, ३७५० रुपये किमतीची चांदीची पाच भार वजनाची लक्ष्मी मुर्ती, १५०० रुपये किमतीची चांदीची दोन भार वजनाची हाती लॉकेट, तीन हजार रुपयांची रोकड असा एकुण ९९,७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक कृष्णा पाटील तसेच श्रेपोउनि विजयसिंग पाटील यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
















