
धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील हनुमंतखेडे येथे राहत्या घरात स्वतःच्या मुलाने मद्य पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या आईचा गळा चिरून हत्या केल्याची दुर्दैवी घटना १० नोव्हेंबरला रात्री घडली. या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात शोककला पसरली आहे.
हनुमंतखेडे येथे आई सरिबाबी रसूल पटेल (वय ७३) व त्यांचा मुलगा रशीद रसूल पटेल (वय ५५) हे राहतात. रशीद पटेल हा आईकडून दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सरिबाबी पटेल यांच्या रशीद पटेल याने गळा चिरला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सरिबाबी पटेल यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषीत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपी रसूल पटेल याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच रशीद पटेल यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सत्यवान पवार, सुमित बाविस्कर करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे हनुमंतखेडेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

















