जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस (Conjunctivitis) हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग बळावला आहे. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे व स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कंजक्टिव्हायटीस हा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डोळयांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो वायरस मुळे होतो. जो विशेषतः पावसाळयात होतो. कधी कधी दोन्ही डोळयांवर त्याचा संसर्ग होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला तरी देखील याबाबत सर्व विभागाने दक्ष रहाणे आणि जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
कंजक्टिव्हायटीस आजाराची लक्षणे !
डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे चिकटपण येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लालसर होणे डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी !
डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादी स्वतंत्र ठेवावेत. इतर व्यक्तीच्या रुमाल टॉवलने डोळे पुसू नयेत. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयांची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषधी डोळयात टाकावीत. डोळयातून पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षण आढळतात अशा व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करणे तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना !
वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाह्य रुग्ण स्तरावर रुग्णाची तपासणी व उपचार, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता असल्यास रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात येते, शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, वसतिगृह, इ. ठिकाणी भेटी देऊन मुलांची तपासणी करण्यात येत आहे, आरोग्य शिक्षण व जनजागृती करणे सुरु आहे. RBSK पथकामार्फत शाळांमध्ये दैनदिन रुग्ण तपासणी करण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.