मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.
“महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
मागील वर्षीही कोरोनाचं थैमान सुरू होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला आंबेडकरी जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यंदा पुन्हा आंबेडकर जयंती तोंडावर असतानाच राज्यात कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे.