धरणगाव (प्रतिनिधी) खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे दुय्यम अधिकारी चौकशी कशी करतील?, असा सवाल मुख्य तक्रारकर्ते श्री.कांडेलकर यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे नेमकी तक्रार
मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतच्या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी विद्यमान सदस्य अशोक शालिग्राम भोलाणकर यांनी खोटे दस्तावेज सादर करून धरणगाव तहसील कार्यालयाकडून मिळविलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळविल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय संतोष कांडेलकर (रा.राजुरा, ता.मुक्ताईनगर) यांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. ७ जून २०२२ रोजी केली होती. धरणगावचे तहसीलदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता न तपासता प्रकरण मंजूर करून उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे पाठविले. त्यांनतर उपविभागीय कार्यालयात सुद्धा कागदपत्रांची खातरजमा न करताच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. धरणगाव तहसीलदार आणि एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी यात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप कांडेलकर यांनी केला आहे.
चौकशी समितीची नियुक्ती
याबाबत चौकशीसाठी दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमून एका महिन्यात चौकशी संपवून त्याचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांच्याकडे सुपूर्द करावा. तसेच सदर अहवाल तपासून तहसीलदार यांनी तो उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा, असा स्पष्ट आदेश दिला. या समितीत निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पाळधी मंडळ अधिकारी आणि बांभोरी प्र.चा येथील तलाठी यांचा समावेश आहे. परंतू महिना उलटून देखील अद्याप याप्रकरणी समितीने चौकशी केली नसल्याचे समोर आले आहे.
मुद्दाम दिरंगाई केली जातेय
याबाबत अनेक दिवसापासून लढा देत आहे. १९४६ चे चुकीचे संदर्भ असूनही स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जातीचा दाखला दिला आहे. याबाबत तक्रार करूनही न्याय मिळण्यास मुद्दाम दिरंगाई केली जातेय. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागेल. परंतू मुळात प्रश्न असा आहे की, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे ज्युनिअर अधिकारी काय चौकशी करणार ?. म्हणूनच महिना उलटूनही अहवाल दिला जात नाहीय. पण याबाबतचा लढा शेवटपर्यंत सुरु राहील.
– संजय कांडेलकर (मुख्य तक्रारदार)
आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी दुय्यम अधिकारी कसे करणार?
धरणगाव तहसील कार्यालयाकडून गंभीर चुका काही प्रकरणात झालेल्या आहेत. काही प्रकरणांची तर माहिती देखील कार्यालयात उपलब्ध नाही. गेल्या वर्ष भरापासून याकामी पाठपुरावा सुरू आहे. मात्र तहसील कार्यालयाकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. खोटे कागदपत्रं द्वारे जात प्रमाणपत्र मिळविण्याचे काही प्रकार मागील काळात झाले आहेत. काही अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कनिष्ठ कार्यालयातून प्राप्त प्रकरण हतळल्याचे स्पष्ट होते.
– जितेंद्र महाजन (संघटक, उत्तर महाराष्ट्र, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ)
दरम्यान, याबाबत धरणगाव तहसीलदार यांना व्हाटस्अपवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी बातमी अपडेट होईपर्यंत उत्तर दिलेले नव्हते. तर प्रांत अधिकारी यांचा फोन सतत व्यस्त येत होता. दोघांकडून संपर्क झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया अपडेट करण्यात येईल.