मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे ५० तरुणांची माथी भडकावून त्यांना देशद्रोही कारवायांसाठी उद्युक्त करणाऱ्या ‘इसिस’च्या दोन दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
मोहम्मद झोएब खान आणि मोहम्मद शोएब खान अशी त्या दोघांची नावे असून ते इसिसच्या छत्रपती संभाजीनगर मोड्युलशी संबंधित होते. यातील मोहम्मद शोएब खान हा लिबियातील इसिसचा हस्तक आहे. मोहम्मद झोएब खान याला गेल्या फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. या दोघांनीही इसिसच्या स्वयंघोषित खलिफाशी निष्ठा अर्पण करण्याची शपथ घेतल्याचे एनआयएच्या निदर्शनास आले होते. त्यांच्याविरोधात ‘जागतिक दहशतवादी जाळ्यातील छत्रपती संभाजीनगरमधील मॉड्युल ‘शी संबंधित प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
एनआयएने केलेल्या तपासात या दोघांनी चालवलेल्या भारतविरोधी कारवायांचा पर्दाफाश झाला होता. एनआयएने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनानुसार, या आरोपींनी भारतात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखला होता. त्यानंतर ते अफगाणिस्तान वा तुर्कीला पसार होणार होते. त्यांनी भारतातील दहशतवादी हल्ल्यांची तपशीलवार योजना आखली होती. विविध ठिकाणी हल्ला कसा करायचा, त्यासाठी तयारी, त्याची अंमलबजावणी कशी करायची आणि हल्ल्यानंतर काय करायचे, अशा बाबींचा त्यात समावेश होता.
इसिसच्या हिंस्त्र आणि अतिरेकी विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्याच्या योजनेतही या दोन दहशतवाद्यांचा सहभाग होता. या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील मुस्लिम तरुणांना इसिसकडे आकर्षित करण्याचा त्यांचा डाव होता. यातील मोहम्मद शोएब खान याने एक व्हॉट्सअॅप गट तयार केला होता. त्यात त्याने छत्रपती संभाजीनगरमधील ५० हून अधिक युवकांचा समावेश केला होता. त्यांच्या मेंदूत इसिसचा क्रूर व हिंस्र विचार भरवून त्यांना भारतविरोधी कारवायांसाठी बहकवण्याच्या हेतूने हे करण्यात येत होते. या गटामध्ये ते स्फोटकांच्या, आयईडी तयार करण्यासंबंधीच्या चित्रफिती प्रसारित करीत होते, असे एनआयएने म्हटले आहे.