चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावात गेल्या महिनाभरापासून पावसाचा हाहाकार सुरूच आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा डोंगरी व तितुर नदीला रात्री सहव्यांदा पुर आला आहे. तालुक्यात यावर्षी अभूतपूर्व असे विक्रमी पर्जन्यमान झाल्याने जवळपास ८८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा चेंदामेंदा झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यात दोन दिवसानंतर पून्हा जोरदार पाऊस आज रात्री पडला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कन्नडसह पाटणादेवी जंगल परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने डोंगरी नदीलाही पूर आला. त्यामुळे शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले असून शेत शिवार जलमय झाले आहे. अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले खरिप पिकांचे नुकसानीमुले शेतकरी हवालदील झाला आहे.
















