चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खरजई येथे पोटात चाकू खुपसून ३२ वर्षीय तरूणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना २३ राेजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे हा गेल्या दोन महिन्यांपासून खरजई येथील आपल्या आत्याकडे राहत होता. काही दिवसापूर्वी प्रवीण उर्फ मोन्या याने खरजई गावातील पिंटू शिंदे या तरुणास मारहाण केली होती. दरम्यान, २३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सतीशने प्रवीण याला पिंटू शिंदेला केलेल्या मारहाणीबाबत विचारपूस केली. त्याचा राग आल्याने प्रवीणने सतीशला शिवीगाळ केली. थोड्याच वेळात दोघांमध्ये झटापटी झाली. तशात प्रवीण सोनवणे याने खिशातून चाकू काढला व सतीशच्या पोटात डाव्या बाजूने दोन-तीन वेळेस भोसकले. सतीशचा भाऊ संजय सोनवणे याने जखमी सतीशला तत्काळ दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सतीश साेनवणे यांना मृत घोषीत केले. दरम्यान, संजय साहेबराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. या घटनेचा तपास एपीअाय सागर िढकले करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.