चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाडी यांच्याकडे कोंबड्या सुपूर्त करून शिवसेनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला.
काल दि. २३ ऑगस्ट २०२१ रोजी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना राणे म्हणाले की, बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव, आणि विचारून बोल म्हणावे. त्यादिवशी नाही का, किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे बेजबाबदारपणाचे विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सार्वजनिक अपमान करणारे आणि सार्वजनिक आगळीक होण्यास सहाय्य होईल, असे विधान राणेंनी केले आहे.
वर्गा-वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण करणारे द्वेषभाव वाढविणारे असे राणेंचे विधान आहे. राणेंचा समाजा समाजात व महाराष्ट्रातील शांत जनमानसात दुष्टवा व तेढ निर्माण करण्याचा दूषित हेतू आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन नारायण राणे यांच्यावर तातडीने भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५ (२), १५३ ब(१)(क) खाली गुन्हा दाखल करावा. तशी प्रथम खबर अहवालाची प्रत आम्हाला द्यावी व आरोपी नारायण राणे याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाडी यांच्याकडे कोंबड्या सुपूर्त केल्या.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, भिमराव खलाने, तुकाराम पाटील, संजय संतोष पाटील, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, मुराद पटेल, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, दिलीप देवराम पाटील, अनिल पाटील, नकुल पाटील, अल्पसंख्यांक शहरप्रमुख वशीम, चेअरमन जावेद शेख, आण्णा पाटील, हिम्मत निकम, अजिज मिर्झा, शुभम राठोड, सुभाष राठोड, दिनेश घोरपडे, दिलीप राठोड, अशोक बोराडे, सोमनाथ साळुंखे, आशिश सानप, सागर पाटील, रॉकी धामणे, विजय गायकवाड, सचिन भोई, संजय पाटील, भरत गायकवाड, निलेश गुंजाळ, आबा सैदाणे, बालाजी कोळी, सागर कोळी, आधार गायकवाड, राजेंद्र शिंदे, बाला अहिरे, मयुर पाटील आदी उपस्थित होते.