चाळीसगाव (प्रतिनिधी) प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीवर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी तालुक्यातील कोदगाव येथे उघडकीस आली होती. . बाळू सिताराम पवार (३५, रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मयताचे नाव आहे. दरम्यान, जळगाव एलसीबीच्या पथकाने रात्रभर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करत संशयित महिला व तिच्या चुलत दिराला अटक केली.
पतीच्या त्रासाला कंटाळली होती !
राष्ट्रीय महामार्ग ५२ वर कोदगाव शिवारात मंगळवारी रात्री ११ वाजेच्या पूर्वी ऊसतोड कामगार बाळू सिताराम पवार याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगडही मिळून आला होता. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खूणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, मयत बाळू पवार हे पत्नी वंदना पवार (३०) हिच्यासह न्यायडोंगरी येथे राहत होते. वंदना हिस बाळू हा दारु पिवून शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यामुळे ती त्याच्या त्रासाला कंटाळली होती.
चुलत दिरासोबत दोन वर्षापासून प्रेमसंबंध !
वंदना पवार हिचे चुलत दिर गजानन राजेंद्र पवार (३२, रा. न्यायडोंगरी ता. नांदगांव जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातील पती बाळूचा अडथळा दूर करण्यासाठी वंदना हिने गजानन याच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारु पाजली. सायंकाळी वंदना हिने आपणास माहेरी कन्नड येथे जायचे आहे, असे सांगत बाळू यास गजानन याच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले. वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले.
मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकला !
दोघांनी संशय येवू नये म्हणून मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले. दरम्यान, तुषार अनिल देसले (रा. कोदगांव, ता. चाळीसगाव) यांनी १८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसात अपघाताची माहिती दिली. त्यावरुन चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सपोनि सागर ढिकले यांनी फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंगावरील खुणांमुळे पोलिसांचा संशय बळावला !
बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरुन मयताच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली. वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केली असता संशय आणख वाढला. चाळीसगाव रेल्वेस्थानक परिसरातून बुधवारी सायंकाळी वंदन व गजानन यांना ताब्यात घेण्यात आले. तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
मोबाइलच्या लोकेशनवरून छडा
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची झाडाझडती घेतली असता पोलिसांना मृत इसमाच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला. त्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीला फोन करून तू कुठे आहे असे विचारले, त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना सांगितले की मी सध्या शिर्डीला आहे आणि माझा पती नायडोंगरीला गेला आहे. परंतु पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आला. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने तात्काळ महिलेचा फोन ट्रेस केला असता सदर महिलेचे लोकेशन चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेशन जवळ असल्याचे स्पष्ट झाले. लोकेशन नुसार एलसीबीसह स्थानिक पोलिसांच्या पथकाने रेल्वे स्टेशनला शोध घेतला असता महिला तेथे आढळून आली. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीसह चाळीसगाव पोलिसांचे पथक यशस्वी झाले.