चाळीसगाव (प्रतिनिधी) दुसरीही मुलगीच झाली म्हणून पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाड घालून जीवे ठार मारले. त्यानंतर पतीने देखील रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि .२९ रोजी रात्री एक वाजेनंतर करगाव रोडवरील जय गणेश नगरात घडली.
याबाबत अधिक असे की, चाळीसगावच्या जय गणेश नगरात सूरज दिलीप कुऱ्हाडे (२८) हा पत्नी रेशमा सूरज कुऱ्हाडे (२४) व दोन मुलीसह वास्तव्यास आहे. पती-पत्नी खड्डे खोदण्याचे काम करून उदरनिर्वाह भागवित होते. गेल्या तीन महिन्यापूर्वी रेशमा हिला दुसरी मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. २५ रोजी सूरज हा पत्नीला घेण्यासाठी जुनवणे (जि. धुळे) येथे गेला होता. दोन दिवस सासरवाडीला राहिल्यानंतर २८ रोजी तो पत्नी व दोन्ही मुलींना घेवून चाळीसगावला आला. बुधवारी सकाळी सूरजच्या घरातून लहान बालिकेचा रडण्याचा आवाज येत होता. शेजारच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना रेशमा ही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.
घटना कळताच आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी रेशमाच्या माहेरी घटनेची माहिती दिली. घटनास्थळी सूरज मात्र उपस्थित नव्हता. त्याचवेळी सूरजच्या घरापासून जवळच असलेल्या धुळे रेल्वे मार्गावर रेल्वे खाली एका इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तिथे पाहणी केली असता तो मृतदेह सुरज याचा असल्याचे आढळून आला. मृत रेशमाचा भाऊ प्रताप शांताराम गायकवाड (रा.जुनवणे) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन मयत सुरज कुऱ्हाडे याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.















